शाळा बंद, शिक्षण सुरू
शाळा बंद शिक्षण सुरू उपक्रम,
माझी यशोगाथा video
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ममदापूर मराठी ,तालुका=राहता, जिल्हा= अहमदनगर
वर्गशिक्षिका= श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब
कोरोनाच्या विश्वव्यापी महामारी समाजजीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला. त्यात शिक्षणक्षेत्र देखील या संकटापासून वाचवू शकले नाही. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशांमध्ये संचारबंदी लागू होऊन मार्च 2020 ला सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि क्षणभर वाटले मुक्त शिक्षणाची दारे आता बंद झाली.मन सैरभैर झाले.चोहो बाजूंनी कोरोनाचे वादळ आणि या सर्वांमध्ये हेलकावे खात असलेले आपले शैक्षणिक गलबते! मन अधिकच अस्वस्थ होऊ लागले. पण शिक्षणाची ही ज्ञानगंगा वाहती ठेवण्यासाठी काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता.म्हणून ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांची अभ्यासक्रमाशी नाळ जुळलेली राहावी व विद्यार्थी अध्ययन प्रक्रियेत जुळलेला राहावा या विचारातून जन्म झाला एका नव्या उपक्रमाचा म्हणजेच वर्क फ्रॉम होम आणि यातूनच झाला ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा.
सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण हळूहळू गाडी रुळावर येऊ लाग ली.प्रारंभी अनेक पालक, विद्यार्थी, शिक्षक यांच्या पुढे ऑनलाइन शिक्षण एक आव्हानच बनले होते. परंतु जसजसे दिवस पुढे सरसावून मार्च महिना संपून जून-जुलै महिना उजाडला. तरीही कोरोनाचे संकट संपत नाही म्हटल्यावर शिक्षणाचे नवनवीन बदल व पर्याय स्वीकारणे शिक्षक पालक व विद्यार्थी यांना अपरिहार्य ठरले. व शाळा बंद पण शिक्षण सुरू हा उपक्रम चालू झाला.
१)व्हाट्सअप ग्रुप व ऑनलाइन शिक्षण
मार्च महिन्यात शाळा बंद झाली आणि मी इयत्ता चौथी वर्ग शिक्षिका या नात्याने प्रथमतः विद्यार्थ्यांचे व्हाट्सअप ग्रुप बनवले. वर्गाचा पट 37 व स्मार्टफोन फक्त वीस विद्यार्थ्यांकडे होते.परंतु एकमेकां शेजारी असलेल्या मुलांना मदत करणे व्हाट्सअप मेसेज एकमेकांपर्यंत पोहोचवणे. बहीण भावंडा मध्ये एकत्र स्मार्टफोन वापरणे.इत्यादी उपाय करून 100% विद्यार्थ्यांचा सहभाग यात करून घेतला.मग व्हाट्सअप च्या माध्यमातून शैक्षणिक चर्चा, दीक्षा ॲप्स चा वापर, विविध शैक्षणिक ॲप इत्यादी माहिती, युट्यूब चे व्हिडिओ लिंक इत्यादी शेअर करणे, दररोज त्यांचा आढावा घेणे हे उपक्रम सुरू झाले. या अंतर्गतच कोविड १९ विविध गुणदर्शन स्पर्धा,उदाहरणार्थ हस्ताक्षर,रांगोळी ,चित्रकला, निबंध, इत्यादी स्पर्धा घेतल्या.अनेक विद्यार्थ्यांनी त्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अधून मधून व्हिडिओ कॉल करणे, विद्यार्थी पालक यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणे, त्यांना येणाऱ्या अडचणी समजून घेऊन योग्य ते मार्गदर्शन करणे, तरी उपक्रम सुरु झाले होते. आकाशवाणी दूरदर्शन वरील टिलिमिली मालिका,दररोज येणारी अभ्यासमाला तसेच इतर तंत्रस्नेही शिक्षक बंधू-भगिनींची स्मार्ट पीडीएफ इत्यादींद्वारे शिक्षणाची दारे खुली करण्यात आली. या माध्यमातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे मूल्यशिक्षण,शारीरिक शिक्षण व आरोग्य, अनौपचारिक शिक्षण इत्यादी शिक्षण सुरू आहे.
स्वनिर्मित इ-लर्निंग शैक्षणिक साहित्य निर्मिती उपक्रम
हळूहळू विद्यार्थ्यांच्या समस्या लक्षात आल्या मग त्यांना समजेल उमजेल अशा भाषेत स्वतः शैक्षणिक साहित्य तयार करण्यास सुरुवात केली व निर्मिती इ लर्निंग शैक्षणिक साहित्याचा वापर मुलांचा सुरू झाला. त्यात चित्ररूप पीडीएफ फाईल.,स्मार्ट पीडीएफ ,स्वतःचे edu.guru हे यूट्यूब चैनल बनवून दररोज एक व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी तयार करुन अपलोड करणे शैक्षणिक blog लींक शेअर करणे,हे उपक्रम नित्यनियमाने सुरू झाले. आपणच तयार केलेल्या ई-लर्निंग साहित्य आपल्याच विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करताना आनंद गगनात मावत नव्हता. ट्विन क्राफ्ट द्वारेर बनवलेले व्हिडिओ असो की क्वीन मास्टर मध्ये वेगवेगळे ॲनिमेशन देऊन बनवलेले व्हिडिओ असो माझ्यासाठी मात्र तंत्रज्ञानाची वेगवेगळी दालने खुली झाली होती. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या ऑनलाइन टेस्ट विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअप च्या माध्यमातून पोहोचत होत्या.विद्यार्थीदेखील केलेल्या अभ्यासाचे स्क्रीन शॉट काढून वहीचे फोटो काढून ग्रुप वर टाकत आहेत.विद्यार्थी, शिक्षक यांच्यासाठी हे सर्व काही नवीन असले तरी बदल स्वीकारणे आता अपरिहार्य झाले आहे. म्हणूनच स्वतः तंत्रज्ञानात पारंगत होण्यासाठी मी तंत्रस्नेही शिक्षक बंधु--भगिनींची मदत घेतली. तसेच रोटरी क्लबच्यावतीने आयोजित आयटी स्किल फॉर स्मार्ट मधील तंत्रज्ञानाशी निगडित पंधरा कौशल्यांचे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले व माझे ऑनलाइन शिक्षण सुरू झाले.
I
पटनोंदणी चे आव्हान
जून महिना सुरू झाला आणि इयत्ता चौथीचे विद्यार्थी पुढील वर्गात इयत्ता पाचवीचा वर्ग नसल्याने हायस्कूलमध्ये शिकण्यास गेले . जुन २०२० पासून इयत्ता पहिली च्या वर्गाची जबाबदारी माझ्यावर आली. कुटुंब सर्वेक्षणानुसार २२ दाखल पात्र विद्यार्थ्यांची यादी होती. परंतु covid १९ मुळे आता पट नोंदणी होते की नाही याची चिंता सतावत होती. परंतु पालकांना फोनद्वारे संपर्क साधून,त्यांचे प्रबोधन क रून Smc सदस्यांची मदत तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या मदतीने 100% पटनोंदणी केली. व पुन्हा नवीन इयत्ता पहिलीच्या वर्गाचा व्हाट्सअप ग्रुप बनवून ऑनलाइन शिक्षण सुरू झाले. विद्यार्थी, शिक्षक यांची ओळख प्रथमच तंत्रज्ञानाद्वारे झाली. प्रथमच झूम क्लासचे नियोजन करून प्रत्यक्ष विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वीस वर्षाच्या सेवेत प्रथमच हा अनुभव आला.covid १९ च्या संकटामुळे हे पहिल्यांदाच घडलं.अशाप्रकारे शंभर टक्के विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप केले. शैक्षणिक दिनदर्शिका झेरॉक्स तसेच व्हाट्सअप द्वारे पीडीएफ पुरविल्या.त्याचबरोबर दैनंदिन अभ्यास माला व घरचा अभ्यास पीडीएफ यादेखील विद्यार्थ्यांना नियमित पणे देणे व त्यांचा आढावा घेणे हे शैक्षणिक उपक्रम नियमितपणे सध्या चालू आहे. परंतु तरीही मनात कुठे तरी खंत होती एक प्रश्न सतत अस्वस्थ करत होता की ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा नाहीत त्यांच्या शिक्षणाचे काय आणि मग त्यातूनच नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू झाला तो म्हणजे
शिक्षण आपल्या दारी ,ऑनलाइन शिक्षणाला ऑफलाइन शिक्षणाची जोड
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील ममदापूर हे एक गाव. गावात जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथी ची शाळा आहे. शाळेचा पट 102 असून पालकांचा मुख्य व्यवसाय शेतमजुरी आहे. सर्वच पालक आपल्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा पुरवू शकत नाही व अनेक पालकांसमोर अँड्रॉइड फोन,टिव्ही, मोबाईल रेंज, नेट पॅक या समस्या आहेतच. मग शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम कसा राबवणार या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न सतत अस्वस्थ करत असताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जगधने मॅडम व मी श्रीमती सोनवणे मॅडम आम्ही सोशल डिस्टन्स ठेवून शिक्षण थेट मुलांच्या दारी घेऊन जाण्याचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.
विद्यार्थी, पालक यांना थेट घरी जाऊन शैक्षणिक मार्गदर्शन केले. कोरोनाच्या या संकट काळातही आम्ही शिक्षक भगिनींनी ऑनलाइन शिक्षणाबरोबरच ऑफलाईन शिक्षण देण्याची ही शक्कल लढविली व शाळा बंद पण शिक्षण चालू हा उपक्रम सुरू ठेवला आहे. व्हाट्सअप वर आलेल्या पीडीएफ च्या झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांना देणे तसेच इतर शैक्षणिक साहित्य, पाठ्य पुस्तक वाटप, कोरोना जनजागृती, वैयक्तिक मार्गदर्शन इत्यादी उपक्रम तळमळीने राबवत आहे.त्यासाठी पालक वर्गातून व गावातून कौतुक होत आहे. व मला ही ख-या अर्थाने समाधान व आनंद वाटत आहे.


Comments
Post a Comment