उत्सव आनंदाचे
फुलोरा कलेचे माहेरघर
२४ जुलै २०२०
आजचा उपक्रम=उत्सव आनंदाचे
आपल्या भारत देशांत प्रत्येक सण अगदी उत्साहाने ,आनंदाने साजरी केले जातात. हिंदूच नव्हे तर सर्वच धर्मात सणांना अनन्य साधारण महत्व आहे.एका अर्थाने या सणांमूळे आपण संस्कृती संवर्धन व संस्कृती संक्रमणाचे काम करत असतो. हे सण म्हणजे मानवी जीवनाचा एक अविभाज्य भागच बनले आहे. सणांमूळे समाजात उत्साह,उल्हास, आनंद, आदसभाव वाढीस लागतो एकोपा टिकून राहतो. जीवनाला नवीन उभारी येते एक नवी दिशा मिळते.पर्यायाने देश एकसंध, बलशाली होतो.
सर्व सणांत परमेश्वराची भक्ती प्रधान आहे. बघा ना विचार केला तर प्रत्येक सण व निसर्ग ऋतू चक्र यांची सांगड अगदी योग्य पध्दतीने घातली आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची योग्य सांगड घालून आपल्या जीवनाला एक नवचैतन्य या सणांनी दिले आहे. प्रत्येक सणांची निसर्गाशी सांगड घातली आहे. या पाठीमागे निसर्ग तुमचा अन्नदाता आहे, निसर्गाचे संवर्धन करा. तूम्ही निसर्गाला जपा म्हणजे निसर्ग तुम्हाला जपेल तूम्हाला भरभरून देईल असा संदेश जणू प्रत्येक सणांद्वारे प्राचीन ऋषीमुनींनी दिला आहे. म्हणूनच वर्षप्रतिपदा म्हणजे पाडवा असो वा अक्षय तृतीया नागपंचमी, गौरी गणपती, दसरा ,दिवाळी, मकरसंक्रांत, होळी, या प्रत्येक सणांची निसर्गाशी एक विलक्षण अशी घट्ट वीण जोडली गेली आहे.सर्वांनी एकत्र येणे, सात्विक विचार, नियमांचे पालन करणे ,परंपरा टिकवणे असे अनेक लाभ या सणांमूळे होतात.
संपूर्ण जगात भारत हा असा एकमेव देश आहे कि जेथे विविध धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि आपले सण उत्साहाने साजरे करतात. सण मानवाचे जीवन सुसह्य करते असे नाही तर ते अधिक आरोग्यदायी आणि बलशाली करते.प्रत्येक सण जर तुम्ही डोळ्यापुढे आणला तर तुम्हाला या सणांचे महत्त्व समजून येईल.
दिवाळीचा सणच पहा ना. दीपावलीला सणांचा राजा म्हटले आहे. शरद ऋतूच्या मध्यभागी येणाऱ्या या सणाच्या वेळी घरं धन धान्याने भरलेली असतात. आर्थिक संपन्नतेने सर्वत्र उत्साह संचारलेला असतो. प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांचा वनवास भोगून अयोध्येत प्रवेश केला तेव्हा दीपोत्सव आणि त्यांचे स्वागत केले. दीपावलीतील धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज या प्रत्येक दिवसाचे महत्त्व आणि संदेश सर्वांना
सुख आणि आनंददायी जीवन जगण्यास प्रेरित करत असतो.दीपावलीच्या एकाच कारणामुळे संपूर्ण देशाचा माहोल बदलून जातो दीपोत्सवाने अंधकार नाहीसा तर होतोच. पण मानवा बरोबर देशाच्या प्रगतीची दिशा उजळून टाकतो.आता तर नव्या पिढीचा उत्साही आनंददायी सहयोगाने प्रत्येक सणाला एक वेगळीच किनार लाभली आहे.जी देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने लाख मोलाची आहे.अर्थात सणांचे सध्याचे स्वरूप बदलत चालले आहे आणि त्यातून कोवीड-१९ म्हणजेच कोरोनाचेही सावट या सणांवर आलेले असले तरीही त्याची समाजाशी असलेली नाळ मात्र तुटलेली नाही.
म्हणूनच आपल्या वाडवडिलांनी सुरू केलेली सणांची परंपरा आपण आणखी सतेज केली पाहिजे. सणांचे स्वरूप बदलले तरी मूळ ढाच्यात बाधा पोहोचता कामा नये.कारण सण म्हणजे भारतीय संस्कृतीचं लेण आहे.सण नसते तर समाज ,मानवी मनं हि रुक्ष झाली असती. सण हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे. तो सदैव तेजोमय आणि बलशाली राहिला पाहिजे. यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहूया.
लेखिका =सोनवणे वैशाली नानासाहेब
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteNice article 👍
ReplyDelete