तस्मै श्री गुरवे नमः
तस्मै श्री गुरवे नमः
शिंपल्यात मोती तयार होण्यासाठी शिंपल्याला स्वाती नक्षत्राची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे शिष्याच्या जीवनात परिपूर्णता आणण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. अशा या गुरु-पूजेचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध पौर्णिमा. हि भारतीय संस्कृती मध्ये 'व्यास पौर्णिमा' म्हणून ओळखली जाते. या दिवशी संस्कृतीला महान बनवणाऱ्या व संस्कृतीचे यशस्वी संक्रमण करणाऱ्या ऋषींचे अर्थात आपल्या संस्कृतीला पाचवा वेद म्हणून ज्याला गौरवण्यात येते,असा संस्कृतीचा महान ज्ञानकोश 'महाभारता सारखा' ग्रंथ ज्यांनी दिला,त्या वेद व्यासांच्या पूजनाचा कृतज्ञता दिवस म्हणजेच 'गुरुपौर्णिमा'होय.महर्षी व्यासांचे आचार आणि विचार समाजातील सर्व व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम अनेक संत-महंत मोठ्या तन्मयतेने करत आहेत.व्यासांचे विचार ज्या ठिकाणाहून समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम सतत चालू असते त्यास व्यासपीठ असे म्हणतात.व्यासपीठावरून जो विश्वकल्याणासाठी निस्वार्थ भावाने कार्य करतो, स्वतःचे जीवन व्रतस्थ करून वेद-मान्य,व्यास-मान्य, विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी विविध मार्गाने कार्य करून समाजाचा उद्धार करतो.अशा गुरूंच्या पूजनाचा दिवस, म्हणून आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा असेही म्हणतात.
"गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:|
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः||"
असे गुरूंच्या महतीचे वर्णन केले जाते. गुरु म्हणजे जो लघु नाही तो आणि जो लघुला गुरु बनवतो. गुरु साधकाच्या शिष्याच्या जीवनाचा नकाशा म्हणून कार्य करतो.ज्याच्या जीवनप्रवासात गुरुरूपी नकाशा आहे तो जीवनाचा भवसागर यशस्वीरित्या पार केल्याशिवाय राहत नाही.कोणतीही व्यक्ती गुरू पदापर्यंत पोहोचताच तिच्या वर्तन आणि विचारात बदल झाल्यास शिवाय राहत नाही. कारण गुरूंचा सहवास हा सुमधुरच असतो.
जीवन हे खडतर आहे म्हणून ते जगायला सतत कोणाचा तरी आधार लागतो.आणि हा आधार देण्याची शक्ती गुरूकडे असते. परीस लोखंडाचे सोने बनवतो पण स्वतः सारखा परीस बनवत नाही.मात्र गुरु शिष्याला स्वतःचे गुरुत्व देऊन शिष्याला स्वतःच्या प्रतीमुर्ती रूपात तयार करतो. गुरुचे अनेक प्रकार आहेत.कोणाचे राजकीय गुरु तर कोणाचे अध्यात्मिक गुरु,कोणाचे शेती शास्त्र, नृत्य, अभिनय,खेळ,इत्यादी. अशा गुरूंची कृपा दृष्टी पडताच व्यक्तीच्या मनातील मलिनता निश्चितच दूर होते.अशाच गुरु-शिष्यांच्या जोड्या विश्व परंपरेत गुरू परंपरेत शोभून दिसतात. म्हणूनच राम-लक्ष्मण हे गुरु विश्वामित्र वशिष्ठ यांच्या सेवेत गुंतलेले दिसतात.संजीवनी विद्या प्राप्त करणारा शुक्राचार्यांच्या,शुक्राचार्य जनकाच्या तर जनक याज्ञवल्क्ययाच्या मार्गाने जाताना दिसतात.कृष्ण- सुदामा सांदिपनी यांच्या आश्रमात रमताना दिसत.अर्जुन द्रोणाचार्यांशी गुजगोष्टी करतो, तर कर्ण परशुरामाची अग्निपरीक्षा देण्यातही धन्यता मानतो. मी सॉक्रेटिसचा शिष्य आहे. हे प्लेटो अभिमानाने सांगतो तर प्लेटो माझा गुरु आहे याचा कृतज्ञ भाव मिरवण्यात धन्यता मानतो खरेतर या आणि अशाच शेकडो-हजारो गुरुपरंपरेतील गुरु-शिष्यांच्या जीवनातील आजचा दिवस खऱ्या अर्थाने आत्ममहोत्सवाचा दिवस!आत्मपौर्णिमेचा दिवस!
सद्गुरु हे देवा होऊनही श्रेष्ठ आहे असे श्री संत कबीर यांनी म्हटले आहे.ते म्हणतात की, गुरु हेच आत्मज्ञान प्रज्वलित करू शकतात. गुरुसेवा हाच देव भेटीचा एकमेव उपाय आहे.श्री संत एकनाथांनी आपल्या अनेक अभंगांमधून गुरुजी महात्म्य वर्णन केले आहे. 'ओंकारस्वरूपा सद्गुरु समर्था' असे त्यांनी एका अभंग आरंभी म्हटले आहे.गुरु तत्व हे परमेश्वरी तत्व आहे.
असे म्हटले जाते की,
गुरु हरी हरी विरंची जाण
स्वरूपी तोचि नारायण
मन करुनी निर्वाण
सेवा करावी भक्तीने
श्रीगुरुंना अनन्यभावे शरण जाऊन मानवाने आपला उद्धार करून घ्यावा. गुरुजवळ चंद्राची शीतलता, सूर्याची दाहकता, समुद्राची गंभीरता, हिमालयाची उंची, आणि भूमीचे वात्सल्य असते तर जलाचा अवखळपणा ही असतो. दवबिंदू प्रमाणे गुरुचे विचार असतात. गुरू ज्ञानाचा सूर्य, प्रेमाचा महासागर, शांतीचा हिमाचल असतो. अध्यात्मज्ञानापासून ते संगणक शिक्षण गुरुच देतो. मूल जन्माला आल्यानंतर आई वडील त्याला चालायला शिकवतात व नंतर गुरूंच्या हाती सुपूर्द करतात.तेव्हापासून शिष्य गुरूच बोट धरून जीवनाच्या खडतर प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात करतो. आपल्या जीवनातील अनेक संकटे गुरूंच्या किंवा परमेश्वराच्या खांद्यावर टाकून निष्पाप बालकासारखी गुरुचं बोट धरून चालत राहतो.
सध्या नोकऱ्या नाहीत म्हणून शिकायचं नाही परंतु शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे गुरुच पटवून देतात. मावळत्या सुर्याकडे बघू नका तर उगवत्या सूर्याकडे बघा.आपल्या जीवनाचा उश:काल ही तसाच उगवणार आहे. निराश होऊ नका.हतबल होऊ नका.कठोर परिश्रम करा. अशी प्रेरणा देणारे ही गुरुज असतात. शैक्षणिक क्षेत्रात गुरु हे अति महत्त्वाचे असतात. सामाजिक व्यवस्था आणि प्रसारमाध्यमांनी जीवनाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन हे कितीही सत्य असले तरी गुरूशिवाय तरणोपाय नाही.
जीवनाच्या वाटेवर अवघड डोंगर घाट
गुरुविण कोण दाखविल घाट
असे म्हणतात,ते सूर्यप्रकाशा एवढे हे सत्य आहे. मानवी जीवनातील अंधकार नष्ट करून जीवन तेजोमय बनविण्याचे सामर्थ्य फक्त गुरु सारख्या महामानवा असते. आकाशा सारख्या विशालकाय, निरलोभ, अद्वितीय,अचल, आणि त्रिगुणांचा साक्षात्कार ज्यांच्यात आहे अशा साक्षात गुरुब्रम्हाला माझे त्रिवार वंदन असो.
ज्याप्रमाणे समुद्र शिंपल्यात घालून कुणाला दाखवता येत नाही,फुलांचे चित्र काढून कधी कोणाला सुगंध देता येत नाही त्याप्रमाणे गुरूंचे महत्त्व हे थोड्या थोड्या शब्दात व्यक्त करता येत नाही, म्हणूनच तस्म श्री गुरवे नमः|
लेखिका= श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब
जि.प.प्राथमीक शाळा ममदापुर मराठी,
मोबाईल नंबर =89 99 26 35 88
One of the best article 😊😊😊👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteAmazing blog 👌
ReplyDelete