काव्यतरंग'विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह. पुस्तक परीक्षण
'काव्यतरंग'विविध विषयांना स्पर्श करणारा काव्यसंग्रह.
पुस्तक परीक्षण
(कवी=डॉ. भगवान हेबाडे)
पशुवैद्यकीय क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणारे कवी डॉ. भगवान हेबाडे यांनी काव्यतरंग या शीर्षकाखाली वेगवेगळ्या विषयांवर आपल्या भावना काव्य रुपाने व्यक्त केल्या आहेत. सोलापूर येथील मुक्ता प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.मुखपृष्ठावर निखळ वाहणारा समुद्र, निरभ्र आकाश असे मोहक निसर्ग चित्र आहे. तर मलपृष्ठावर त्यांनी आपला व आपल्या कार्याचा परिचय थोडक्यात चित्रित केला आहे.डॉक्टर भगवान हेबाडे यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून यापूर्वी त्यांनी 'मागे वळून पाहताना'हे आत्म चरित्र व 'अवघड वाटा'हा कथा संग्रह प्रकाशित केला आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर साहित्याची थोडीफार सेवा घडावी या हेतूने त्यांनी हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.
काव्यतरंग या कवितासंग्रहात एकंदर 46 कविता असून विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या आहेत. जसे निसर्गवर्णनपर,सांस्कृतिक,सामाजिक राजकीय, कौटुंबिक, जीवन विषयक, व्यक्तिविशेष, इत्यादी. यावरून कविमनाचे सखोल निरीक्षण व अभ्यासाचे दर्शन आपल्याला होते.कवितेची भाषा शैली सहज सोपी व सुलभ अशी असून वाचकांना सहज अर्थबोध होणारी असल्यामुळे काव्यतरंग वाचताना आनंद तर होतोच पण कवितेतील प्रत्येक वस्तू,व्यक्ती आपणच असल्याचा भास होतो.'मुलगी चाळीस वर्षांची झाली' या कवितेतील
'आई-बाबांची गोड मुलगी तू
चाळीस वर्षांची झालीस तू'
या ओळी वाचून नकळत परकाया प्रवेश होतो.व आपलेच वर्णन जणू कवीने केले आहे. असे वाटून जाते. स्त्रीजीवनावर आधारित स्त्रीच्या कथा ,व्यथा,भावना कवीने,लडिवाळ मुक्ता,अभागी त्या, बायकोची जादू, धंदेवालीची व्यथा अशा कवितेतून नेमक्या समजून घेतल्या आहेत. आजच्या समाजातील स्त्रीचे स्थान, तिच्यावर होणारे अत्याचार, तर मनाविरुद्ध स्त्रीला करावा लागणारा वेश्या व्यवसाय इत्यादी सर्व घटना कभी मनाला दुःख देणार्या वाटतात. येथे कवीच्या संवेदनशील मनाचे दर्शन आपल्याला घडते.
गुलाबाचे मनोगत या पहिल्याच कवितेतून गुलाब व निस्वार्थी प्रेम यांचा सहसंबंध वर्णन करून शेवटी ते म्हणतात
' सौंदर्य दिले सुगंधी केले
देवानी ना केवळ मजसाठी
जीवन असे माझे सारे
सगळ्यांना सुखावण्यासाठी'
असे गुलाबाच्या मनात असणारे दुःखही व्यक्त केले आहे.प्रेमावर आधारित कवितेतून त्यांनी मानवी जीवनाचा जगण्याचा आधार प्रेम असून या प्रेमभावनेची सुरेख वर्णन केले आहे.ते म्हणतात
निखळ निर्मळ प्रेमाचे गोड हे नाते
सदैव टिकून राहावे असे वाटते
तसेच निरपेक्ष अशा प्रेमाची संकल्पना त्यांनी दोस्त या कवितेतून स्पष्ट केली आहे.
यापुढेही नाते-संबंध कवितेत ते म्हणतात
"खरे नाते जे असते विश्वासाचे
निरंतर प्रेमाने टिकून राहते"
त्यांच्या मते प्रेम दोन प्रकारचे असून प्रेमाचा अर्थ या काव्यातून ते म्हणतात, "मतलबी प्रेम होते त्रासदायी
समर्पित प्रेम जे आनंददायी"
निसर्गवर्णनपर कवितेतून त्यांनी निसर्ग आपला गुरू असून त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. म्हणूनच पक्ष्यांचे जगणे या कवितेत आहे त्या परिस्थितीत पक्षी कसे आनंदाने जगतात हे सांगितले आहे.याशिवाय निसर्गावर आपण कसे अवलंबून आहोत व निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे होणार्या परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागते. यात आपलीच असणारी चूक कवीने पाऊस आनंदाचा,लहरी पाऊस, महापूर,निसर्गराजा अशा निसर्गवर्णनपर कवितेतून कळत-नकळत दाखवून देताना ते म्हणतात, "निसर्गाचा समतोल आम्ही बिघडवला
आमची चूक कळली आम्हाला
म्हणूनच तू लहरी झाला"
निसर्गा प्रमाणेच कवीने सामाजिक-राजकीय विषयांवरही काव्यरचना केली आहे 'पुढारी असेही' या काव्यात पुढाऱ्यांचा खोटा बडेजाव वर्णन करून शेवटी ते म्हणतात,
'असे पुढारी नको रे बाप्पा
मुळातून अशांना उखडून टाका'
याप्रमाणे निवडणुका जवळ आल्यावर उमेदवारांचा ढोंगीपणा कसा असतो हे वाचकांसमोर प्रदर्शित करून मतदारांना उद्देशून ते म्हणतात
मतदारांनो शहाणे वर्मा
डोळस होऊन मतदान करा
अशा प्रबोधनपर काव्यरचनाही त्यांनी या काव्यसंग्रहात केल्या आहेत.
मानवी स्वभावाचे वर्णन करताना इगो या कवितेत ते म्हणतात
'इगो असावा स्वाभिमानाने जगण्याचा
नसावा तो जीवनाची अधोगती करण्याचा'
खरंच मानवी स्वभावात इगो आला की जीवनातील विश्वास, प्रेम,नातेसंबंध सर्वच संपुष्टात येऊन जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही.
यापुढे चंद्रयान या कवितेद्वारे कवीने मानवाने केलेल्या वैज्ञानिक प्रगतीचे यथार्थ वर्णन करून प्रगती करताना अपयश जरी आली तरी खचून न जाता नव्या उमेदीने आपले काम करणे.कारण अपयशाच्या कठीण खडका खाली यशाचा झरा पाझरत असतो. हा संदेश देताना कवी म्हणतात,
'नवी उमेद नवे चैतन्य उठले
मामा लवकरच पुन्हा भेटू'
अशा प्रकारे कवी डॉ.भगवान हेबाडे यांच्या कविता आपल्या मनाला कधी अस्वस्थ करतात तर कधी आनंद देतात तर कधी आपल्या मनातल्या भावना व्यक्त करतात. यातील प्रत्येक कविता ही हृदयस्पर्शी असून कवी मनाचा हळवेपणा, संवेदनशीलपणा या काव्यसंग्रहातून प्रतिबिंबित होतो. त्या दृष्टीने या कविता खूपच वाचनीय आहेत. प्रत्येक शाळेत व घराघरात लहानथोरांच्या हातात असावा असाच हा काव्यसंग्रह असून डॉ. भगवान हेबाडे यांच्या या पहिल्याच काव्यसंग्रहास खूप खूप शुभेच्छा!!
लेखिका=श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब
जि.प.प्राथमिक शाळा ममदापुर मराठी मोबाईल नंबर- 89 99 20 35 88
Comments
Post a Comment