१५मे)भारतीय वृक्ष दिनानिमित्त-
(१५मे)भारतीय वृक्ष दिनानिमित्त-
कोरोना लॉकडाऊन मध्ये वृक्षारोपणाची संधी.
रस्त्याच्या कडेला आंब्याचे एक झाड होते. झाडाला आंबे लटकले होते. वाटेने जाणाऱ्या एका माणसाने झाडाला दगड मारून पिकलेले आंबे पाडले व खात-खात निघून गेला. हे दृश्य पाहून आकाशाने वृक्षाला म्हटले,"अरे आम्रवृक्षा!माणसं वाटेने जाताना रोज तुला दगड मारतात तरीही तू त्यांना फळ का देतोस?"आंब्याचे झाड हसून म्हणाले,"आकाश दादा, मनुष्य भ्रष्ट होऊन चुकीचे वागत असला तरी आपण मात्र तसं वागून जमणार नाही. दगड मारणे हा जरी माणसाचा स्वभाव असला तरी त्याला गोड आंबे देणे हा माझा स्वभाव आहे." शेजारच्या झाडाकडे बघ त्याला कोणी दगड मारत नाही कारण त्याला आंबेच नाहीत.शेवटी ज्या झाडाला फळे येतात त्याच झाडाला लोक दगड मारतात.
गोष्ट अतिशय छोटी पण शिकवण मात्र खूप मोठी आहे. असे हे परोपकारी वृक्ष आपल्याला नेहमीच मदत करणारे असतात. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगांमध्ये म्हटलेच आहे की,
हे"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पक्षीही सुस्वरे आळविती"
आपल्या भूतलावर वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत. आंबा गोड फळे देतो तर वडाचे झाड शीतल छाया देते, पारिजातक सुंदर फुलांचा सडा घालतो.तसेच वृक्षापासून मिळणारी फळे, फुले, लाकूड ,मध, डिंक ,औषधे या सर्व नैसर्गिक संपत्तीचा उपयोग मानवी जीवनात होत असतो. वृक्ष वातावरणातील हवा शुद्ध ठेवतात तसेच प्रदूषण रोखण्यास मदतही करतात.वृक्ष म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेले अमृत वरदान होय. वृक्ष मनुष्य जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. वृक्षांचा मानवी तसेच समाजजीवनाशी फार जवळचा संबंध आहे.ते केवळ संपत्ती निर्माण करणे किंवा मानवी जीवन समृद्ध करण्याचे काम करत नाही तर पर्यावरणातील वातावरणाचा समतोल राखण्याचे बहुमोल कार्य वृक्ष करतात. प्रत्येक वृक्षाचे आयुष्य 100 ते 150 वर्षे आहे. तर त्याचा उपयोग श्रेष्ठ मानला गेला पाहिजे.त्याची थंड छाया मानवापेक्षाही प्राण्यांना समाधान देते. मधुर फळांनी माधुर्य मिळते. थकलेल्या भागलेल्या लोकांचे हे विश्रांतीची उत्तम माहेरघर आहे. यांच्या सहाय्याने आपण खुशाल जगू शकतो. वृक्षापासून पाऊस पडतो पण पाण्याचे नियमन राखण्याचे कामही वृक्ष करतात. त्यामुळे भरपूर वृक्ष असणे गरजेचे आहे. निसर्गाचे सौंदर्य खुलून दिसते ते उंच वाढलेल्या तसेच शोभिवंत फुलांच्या झाडांमुळेच. म्हणूनच वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे ही आज काळाची गरज बनली आहे.
मानवाने आपल्या गरजा भागविण्यासाठी विविध व्यवसाय यांच्या आधारे स्वार्थापोटी या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अतिरिक्त वापर सुरू केला आणि जंगल संपत्ती,भूसंपादन,जलसंपदा आणि वातावरण या संपत्तीचा ऱ्हास होऊ लागला. आज जेथे आपणास वनसंपदा हवी आहे तिथे आज उंच इमारती दिसत आहे.झाडांच्या जंगलां ऐवजी सिमेंटची जंगलं वाढत आहे. वने आणि शेती कमी करून तेथे बांधकाम झाले आहे.व त्याचा परिणाम आता समोर येऊ लागला आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या असमतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे . खरंतर वृक्षांपासून आपणास खूप काही शिकायला मिळते पण आपण काहीच शिकण्यास तयार नाही. वृक्ष आपली काळजी घेतात.पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. वृक्ष आपले मित्र आहेत.पण त्यांच्याशी मैत्री राखत नाही. आणि म्हणूनच आज पर्यावरणाची समस्या उभी राहिली आहे. वृक्षतोड करून निसर्गाचे संतुलन बिघडवून निसर्गाचा रोष आपणच ओढवून घेतला आहे. आज जगभरात कोरोना रुपी राक्षसाने थैमान घातले आहे,हाहाकार माजवला आहे.अनेक माणसे या रोगामुळे मृत्युमुखी पडत. कदाचित हिच निसर्गाने आपल्याला दिलेली शिक्षा आहे की काय असे वाटते.जो निसर्गाला जपतो, निसर्ग त्याला जपतो. पशु,पक्षी, प्राणी,कीटक,वृक्ष,लता,वेली हे सगळे निसर्गाचा नियम पाळतात.निसर्गही त्यांना काही कमी पडू देत नाही. म्हणूनच कोरोनारुपी राक्षसाच्या विळख्यात फक्त माणसेच अडकले.परंतु पशुपक्षी, प्राण्यांना त्याचं काय? ते तर निसर्गाच्या सानिध्यात आनंदाने जीवन जगत आहे . एवढेच नाही तर लॉकडाऊन काळात माणूस घरातच अडकल्या त्यामुळे निसर्गातील वातावरणही शुद्ध झाले. त्यामुळे अन्य प्राण्यांना आणखीनच सुखावह जीवन जगता येत आहे.
आज या कोरोना रूपी राक्षसाविरुद्ध लढण्यासाठी माणसाकडे प्रचंड रोग प्रतिकारशक्ती असणे गरजेचे आहे.व ती आपल्याला या निसर्गाकडूनच मिळणार आहे. म्हणूनच निसर्गावर विषारी खते आणि कीटकनाशकांचा मारा न करता आता आपल्याला सेंद्रियशेती वर भर देण्याची गरज आहे. लॉक डाऊनच्या काळात माणसाकडे ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे. माणसाने काही काळ स्वतःचा विचार थांबवून पर्यावरणाच्या बाबतीत थोडे गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.त्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन करणे गरजेचे झाले आहे.आता आपल्याकडे भरपूर वेळ असल्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपले घर-अंगण,आपला परिसर या ठिकाणी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे संतुलन राखण्याची चांगली संधी आपल्याला मिळाली आहे.
विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार एक झाड काय करते?
एक सामान्य झाड वर्षभरात सुमारे 20 किलो धूळ शोषते.
दरवर्षी सुमारे 700 किलो ऑक्सिजन तयार करते.
दरवर्षी 20 टन कार्बन डायऑक्साईड शोषते.
उन्हाळ्यात एका मोठ्या झाडाखाली तापमान सरासरी चार अंशांपर्यंत कमी राहते.
घराजवळील एक झाड ऍकॉस्टिकवॉल सारखे काम करते म्हणजे आवाज/ध्वनी शोषते.
घराजवळ १० झाडे असली तर आयुष्य ७वर्षे वाढू शकते.
म्हणूनच या लॉकडाऊन मध्ये आपल्याकडे असलेल्या वेळेचा सदुपयोग करून आपण आपल्या घराभोवती परिसरात भोवती वृक्षारोपण करुया.घरच्या घरीच भाजीपाला पिकवून रस्त्यांवरील भाजीबाजारात होणारी गर्दी कमी करून कोरोनाला आळा घालण्यासाठी मदत करूया. शक्य असल्यास हायड्रोपोनिक फार्मिंग चा उपयोग करून 'होम गार्डनची'संकल्पना यशस्वी करूया.
जर आपण हे मनावर घेतले तर नक्कीच शक्य होईल.आणि भारत पुन्हा पूर्वीसारखा सुजलाम सुफलाम होण्यास वेळ लागणार नाही.
म्हणूनच म्हणते,
भविष्यात येणारा आत्ताच टाळावा खतरा
वृक्षारोपण करून लॉकडाऊन करावा साजरा
लेखिका-श्रीमती सोनवणे वैशाली नानासाहेब
जि.प.प्राथमिक शाळा ममदापूर मराठी
मोबाईल नंबर= 89 99 26 35 88
Comments
Post a Comment