लॉकडाऊनच्या विळख्यात बळीराजा
लॉकडाऊनच्या विळख्यात बळीराजा
आटपाट नगर होतं. नाव त्याचं भारत होतं.एक काळ असा होता की तिथे सर्व काही व्यवस्थित चाललं होतं.हवा,पाणी,हवामान व्यवस्थित होतं.पाऊस वेळेवर व पुरेसा पडत होता व वेळेवर जात होता.ओढे,नदी,नाले दुथडी भरून वाहत होते.विहिरींना पाझर सुटत होते.त्यामुळे शेतीवाडी व्यवस्थित होती. म्हणून आमचा शेतकरी राजा सुखीसमाधानी व आनंदी होता.देशातील प्रत्येक खेडे स्वयंपूर्ण होते.आजही भारतातील ८०%लोकांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे.भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा भारतीय शेतीचा कणा आहे.पण अलीकडच्या काळात मात्र कृषी क्षेत्राला उतरती कळा लागली आहे.
मग या बळीराजाला कुणाची नजर लागली?खाजगीकरणाची,औद्योगीकरणाची की भांडवलदारांनी आपले स्वार्थी डोके वर काढले म्हणूनच की काय बळीराजा संकटात सापडला?आज विकासाचा केंद्रबिंदू सामान्य माणूस म्हणजेच शेतकरी न राहता भांडवलदार झाला व कृषी खाते दुर्लक्षित झाले.त्यातच नैसर्गिक आपत्ती जसे की अवकाळी पाऊस, वादळे,महापूर,ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ इत्यादी.
शेतीला विज,पाणी या आवश्यक गरजांचा अभाव,शेतकऱ्याच्या पिकांना हमीभाव नाही,अल्पभूधारक शेतकऱ्यांना पिकांसाठी योग्य अनुदान नाही, स्वस्तात बी-बियाणे खते उपलब्ध नाही,शेतीची अवजारे,उत्तम प्रशिक्षण,मार्गदर्शन सवलतीच्या दरात नाही.तसेच मोठ मोठे कारखानदार भांडवलदार शेतकऱ्यांकडून अत्यल्प दरात कच्चा माल खरेदी करतात.त्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे उत्पादन बनवून ते अतिउच्च दारात ग्राहकाला विकतात.उदाहरणार्थ टोमॅटो(कच्चा माल) व त्यापासून तयार होणारे टोमॅटो सॉस(पक्का माल)यांच्या भावात असणारी तफावत. ही आर्थिक दरी कुठे तरी दूर झाली पाहिजे.येथे पक्क्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार त्या संबंधित कारखाना मालकाकडे असतो. मात्र कच्चामाल पिकविण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणारा बळीराजा आपल्या मालाचा भाव ठरवू शकत नाही.तर तो भाव सरकार ठरवते व जो भाव मिळतो त्यातही एवढी तफावत का?अशा अनेक गोष्टी कृषिक्षेत्राला उतरती कळा लावण्यास कारणीभूत आहेत आणि त्यात आणखीनच नव्याने भर पडली ती कोविड-१९ म्हणजे संसर्गजन्य आजाराची आणि त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनच्या घोषणेची.अशा प्रकारे विविध संकटात व या लॉकडाऊनच्या विळख्यात आमचा बळीराजा पुरता चिरडून गेला. हातातोंडाशी आलेला घास कोरोनारुपी राक्षसाने गिळंकृत केला आणि आमचा बळीराजा हवालदिल झाला.त्रस्त होऊन फळबागा,भाजीपाला, उपटून फेकला.कोरोनाच्या संकटामुळे उत्पादन तयार नाही व जे झाले होते ते विकले जात नाही.त्यामुळे पुढील पिकांचे बियाणे,खते,औषधे,मजुरी यासाठी बळीराजा कडे आता पैसे नाहीत.खरिपाच्या पेरणीचा हंगाम जवळ आला असताना बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यासही टाळाटाळ होत आहे.त्यातच शेतकऱ्याला विमा संरक्षण मिळावे म्हणून विमा उतरवला असला तरी विमा कंपन्यांकडून मात्र या बळीराजाला ठेंगाच मिळतो आहे. शेतमालाची निर्यात घटली.त्यामुळे कित्येक माल शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.त्यामुळे या बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असताना देखील हा बळीराजा नव्या जोमाने उठला.कारण तो निस्वार्थी आहे.जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याने दिवसरात्र काबाडकष्ट करून धान्य पिकवले तरच जग पोटभर खाऊन सुखाची झोप घेईल या जबाबदारीची त्याला जाणीव आहे.आणि म्हणूनच कोरोनाच्या या लढाईत तो आपल्या पोटाची खळगी भरणारा अन्नदाता योद्धा बनला. लॉकडाऊनमध्ये आपण जरी सुरक्षित आपल्या घरात बसलो तरी हा अन्नदाता योद्धा मात्र जीवाची पर्वा न करता घरोघर जाऊन आपल्याला अन्नधान्य पूरवत आहे आणि आपण मात्र त्याच्या मालाचा भाव करतो.अहो,मूठभर पिक पिकवायला अक्षरशः रक्ताचं पाणी करुन,अखंड मेहनत करून तो आपल्यासाठी शेती फुलवतो.रात्रंदिवस शेतात राबतो.स्वतः उपाशी राहतो व जगाचा पोशिंदा बनतो. पण त्याच्या मालाला योग्य तो भाव मिळतच नाही.
आज हीच खरी वेळ आहे या बळीराजाला समजून घेण्याची.शासन स्तरावरून अनेक उपाय योजनांची घोषणा मागील आठवड्यात केली गेली.जसे की शेती कर्जावरील व्याजात 31 मे पर्यंत सूट देण्यात आली आहे. तसेच सरकारमार्फत कृषी क्षेत्रासाठी कोरोना संकटकाळातील अतिरिक्त उपायोजना,विविध आर्थिक पॅकेजची घोषणा केली.अनेक वर्षांनी सरकारने कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक धोरण आणले आहे.परंतु ही धोरणे केवळ सुशिक्षित,प्रगतिशील शेतकऱ्यांपुरत्याच मर्यादित न राहता त्या तळागाळातल्या अल्पभूधारक शेतकरी,शेतमजुरांपर्यंत पोहोचायला हव्यात.कारण अनेकदा शासनाने भावनिक होऊन संकटात मदतीचा हात दिला तरी काही राजकारणी लोकांच्या वाईट प्रवृत्तीमुळे ही मदत बळीराजा पर्यंत पोहोचतच नाही,सरकारला शेतकऱ्यांना खरोखरच मदत करायची असेल तर कोरोनामुळे ज्यांची उभी पिके तोंडाशी येऊन तोडून टाकावी लागली त्यांना रोख भरपाई दिली पाहिजे.तसेच संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न,अल्पभूधारक शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ, वीज बिलात सवलत,पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न, शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च व तांत्रिक शिक्षणात ही सवलत इत्यादी व अशा अनेक उपाययोजनासाठी शासन स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाल्यास या बळीराजाला आधार मिळून होणाऱ्या आत्महत्या नक्कीच थांबतील.
आज हे समजून घेण्याची वेळ आली आहे की जर बळीराजा नसता तर आपण कितीही पैसा ओतला तरी आपल्या ताटात अन्नाचा एक कणही पडला नसता.म्हणूनच या लढवय्या अन्नदाता योद्धयाच्या कार्यकर्तृत्वाला मानाचा मुजरा करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणावेसे वाटते,
"मोह नको,अहंकार नको
नको कपडे छान
कोवीड-१९ चे संकट जाऊन
पिकू दे या बळीराजाचे रान"
श्रीम.वैशालीसोनवणे(भालेराव)
जि.प.प्रा.शाळा ममदापुर मराठी
ता.राहता जि.अहमदनगर
मो.नं.८९९९२६३५८८
Comments
Post a Comment